*मजकूर समृद्ध वातावरण काय

ही बालके जेव्हा शाळेत येतात तेव्हा अनेक अर्थाने ती नव्या वातावरणात प्रवेश करीत असतात. शाळेच्या परिसरात आल्यावर विविध झाडेझुडपे व रंगीत भिंतीआणि वर्गात प्रवेश केल्यावर दिसणारा फळा, इंग्रजी शब्दार्थ ,उजळणी ,मोठमोठे उपदेशपर सुविचार ,विविध चित्रे तिही आकलनापलिकडची  या अनोळखी व आपल्याशा  न वाटणाऱ्या भिंती, दिवसभर अनेकदा लक्ष जाऊनही असं त्यात काहीच दिसत नाही. हे साचेबद्ध वातावरण पाहून ते दिवसभरातून अनेक वेळा घरी जाण्यासाठी प्रयत्न करतात व अनेक वेळेस अनिश्चिततेनेच शाळेत येताना आढळतात. माझ्याकडेही असेच घडतंय का? काय आहे कारण- आज बहुसंख्य पालकांच्या महत्त्वाकांक्षा या चाकोरीतल्या आहेत का? स्पर्धेच्या वातावरणात शाळा टिकली पाहिजे! का,निकालभिमुख वातावरणामुळे शिक्षणच साचेबद्ध झाले आहे. मुलांच्या आजूबाजूला जर त्यांची उत्सुकता  अबाधित राहील व कुतूहल जागृत होईल असे वातावरण असेल तर ते नक्कीच समरस होतील. भिंतीवरील व शालेय परिसरातील मजकूर त्यांच्या भावविश्वाशी संबधित आवडीचा , व अर्थपूर्ण वाटेल असा  असायला हवा . मुले संवादातून, निरीक्षणातून, अनुकरणातून अनेक गोष्टी शिकत असतात. अनौपचारिक खेळातूनही त्यांना खेळायला, बागडायला ,गाणे गायला आवडते. शाळेतल्या वृक्षवल्ली ज्याप्रमाणे स्वधर्माने वाढतात तशी आपल्या मुलांचीही मने विकसित व्हायला हवीत.  मुले शाळेत प्रवेश घेतात त्या सुमारास मातृभाषेतील मूलभूत रचनांवर बहुतेकांना विस्मय वाटावा एवढे प्रभुत्व मिळवलेले असते. श्रोता म्हणून संदेशाचे रूपांतर करणे या मुलांना जमते.( उदा. सांगितल्यावर पाण्याचा पेला घेऊन येणे आणि तो जागेवर ठेवणे) सगळ्या क्षमता आपल्या दिनक्रमातून मुले आपले आपण कमावतात. त्यांना कोणी शिकवते असे नाही, जे जे काही त्याच्या भोवताली घडते ते ते सर्वकाही मुलांच्या अवधानाच्या चाळणीतून जातेच आणि मुलाच्या भावविश्वाचा भाग बनते. अक्षर आणि शब्दांची एक प्रतिमा त्यांच्या मनात तयार होते.

नवे प्रश्नांकित चेहरे! नव्या गणवेशात ,नवी नवी दप्तरे घेऊन मोठ्या उत्साहाने शाळेच्या प्रांगणात पाऊल ठेवतात ! ज्यांना आपल्या आईला अथवा आजीला सोडून क्षणभरही दूर राहण्याची सवय नाही. ज्यांना अक्षर ,अंक वाचन,लेखन, शैक्षणिक साहित्य यापैकी काहीच परिचित नाही अशी निरागस, अजाण कोवळी बालके!

आपण रचनावादात सक्रिय शिक्षणालाच महत्त्व देतो आहोत . म्हणूनच आज आपण सुलभकाच्या भूमिकेत आहोत. पाठ्यपुस्तकांच्या आधारे अध्ययन अनुभव देण्याचे माध्यम म्हणजे शिक्षक किंवा सुलभक. एकेक पाठ हा एक एक अनुभव असतो. कारण विविध प्रकारचे वाड्.मय निर्माण केलेल्या लेखकाने मांडलेल्या अनुभवाचे ते एक शब्दरूप असते. म्हणून मुलांना वाचन करायला शिकवायचे असेल तर त्यांना वाचनाच्या अधिकाधिक संधी देणे गरजेचे आहे. त्याच्या अवतीभवती असणारं  वातावरण त्याला अर्थपूर्ण वाटायला हवं. कारण हे वातावरणच भाषेचे धडे देण्यात एक महत्त्वाची भूमिका पार पाडत असतं. मुलांच्या आजूबाजूला भरपूर लिखित मजकूर असेल तर सर्वांगीण विकासास मदत होईल. वर्गात, परिसरात अर्थपूर्ण वाटतील अशा संधी आपण मुलांना वर्गातच उपलब्ध करूनही देऊ शकतो.

कोणत्या संधी आहेत? ज्या मुलांचे वाचन समृद्ध करू शकतात. 

वर्गातील भिंतीच नाहीतर कोपरा न कोपरा वाचनीय करता येईल. फलकाच्या दोन्ही बाजूला दोरीवर लटकवलेली हाताला सहज येतील अशी रंगीबिरंगी पुस्तके टांगून ठेवू या. ज्यामुळे ती सहज हाताळता येतील. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर असणारे कार्टून वर्गांच्या भिंतीवर असणारी चित्रे वाचण्यासाठी नक्कीच प्रेरित करतील. कार्टूनचा  आणि आजच्या मुलांचा तर फार जवळचा संबंध आहे.  कार्टून काय म्हणते ते शब्द वाचण्याचा व संवाद करण्याचा  प्रयत्न करतात. या टप्प्यातून मिळणारा आनंद हाच मुलांच्या वाचन विश्वास प्रेरक ठरतो. ही गोडी अजून वाढावी यासाठी शाळेतील ग्रंथालये ही खूप मोठी भूमिका पार पाडतात. परंतु आपल्याकडील ग्रंथालयेही बंदिस्त स्वरूपातच जास्त प्रमाणात आढळतात. त्यातील पुस्तकेही उत्तमोत्तम लेखकांचे असतात परंतु मुलांना आवडतीलच अशी नाहीत. त्यांच्या आकलनापलीकडची आहेत. भाषेचे अध्ययन चांगले होण्यासाठी विद्यार्थ्याला चांगले ऐकायला, बोलायला व वाचायला आले पाहिजे. तसेच त्यांना चांगले  लिहायला हीआले पाहिजे. यासाठी वर्गात एक  लेखन कोपराही बनवू या. मुले याचा उपयोग लिपी वापरूनच करतील असे नाही तर ती त्यावर रेषा ओढतील , चित्र व आकार काढतील , उच्चाराचा अंदाज करत  अक्षरे लिहितील. तसेच या कोपऱ्यात लिहिण्यासाठी आवश्यक  सामुग्रीही ठेवता येईल जसे. पेन्सिल, कागद रंगपेटी,खडू इत्यादी. तसेच या लेखन कोपऱ्याच्या बाजूला मुलांच्या स्व लेखनाचे मजकूर येण्यासाठी विविध अभिव्यक्तीचे फलक बनवता येतील. उदा. पुस्तक काय म्हणाले? झाडे,फुले काय म्हणाली? यात आपण मुलांनी काय लिहिले हे प्रथम समजून घेण्याचा  प्रयत्न करुया. काय लिहिले हे त्याला वाचून दाखवायला सांगून ते जे सांगेल ते त्याच्या स्व लिपीतील लिखाणाखाली आपण पुन्हा लिहून ठेवावे.  वरील दुसऱ्या अभिव्यक्तीत मुले फुलांची, झाडांची चित्रे, आकारही काढतील. अशा मुलांना रुचणाऱ्या ,आवडणाऱ्या एक ना अनेक संधी तुमच्याही मनाच्या कोपऱ्यात असतील.

या संधी आपल्याला सहज कशा निर्माण करता येतील?

मुलांना अभिव्यक्ती व अनुभव प्राप्त करून देणाऱ्या संधीची इतरांपेक्षा अधिक आवश्यकता असते. कारण भाषा शिकण्यापेक्षा भाषा दैनंदिन वापरात येणे हा भाषा शिक्षणातील महत्त्वाचा भाग आहे. या संधीचा आपण पुरेपूर उपयोग केला तर मुलांचे अध्ययन अधिक समृद्ध होण्यास मदत होईल. हे वातावरण मुलांना भावेल, आवडेलअसे असेल. लिहिलेल्या मजकुराचा काय आणि कसा उपयोग केला जातो हे समजणे मुलांच्या लेखन-वाचनातील  प्रगतीसाठी फारच आवशक्य आहे.

 सूचना

                       माझा वापर करा.

                       येथे हात धुवा.

या छोट्याशा  अर्थपूर्ण शब्दाने सुरुवात करुया. शब्दांचा व दृष्टीचा आवाका सरावाने वाढवूया. अशा सूचना योग्य ठिकाणी शाळेत लिहून ठेवता येतील. सुरुवातीला मुलांना त्याप्रसंगी त्या त्या ठिकाणी वाचून दाखवाव्यात लागतील व कृती करण्यास सांगावे लागेल. मुले हळूहळू वाचण्याचा व त्याप्रमाणे कृतीही करण्याचा प्रयत्न करतील. वर्गातील प्रत्येक वस्तूंना नावे दिली तर ती मुलांच्या दररोज नजरेत येतील. जसे. टेबल, फळा, भाषा पेटी ,गणित पेटी , वाचन साहित्य इत्यादी. 

दिनदर्शिकेच्या ‘साह्याने मुलांना वार, दिनांक, महिना व वर्ष यांची सहज ओळख करून देता येईल. सोबत चित्रात दाखवलेल्या दिनदर्शिकेतून कार्डे बदलून आज कोणता वार आहे? काल कोणता वार होता? उद्या कोणता वार असेल? याचप्रमाणे आवर्जून लक्षात आणून देण्यासाठी दिनांक व महिना यांचेही अशा चर्चेतून व प्रश्नातून काळाचे भान विकसित करण्यास मदत होईल. आपण दररोज मुलांची हजेरी उपस्थितीपत्रकातून भरत असतो. चित्रात दाखवल्याप्रमाणे वर्गात हजेरीतक्ता लावला तर मुले स्वतःची हजेरी स्वतःच  नोंदवतील. या तक्त्यात पहिल्या उभ्या रकान्यात मुलांची नावे, पहिल्या आडव्या ओळीत वारांची नावे या तक्त्यावर वर्ग शिक्षकाचेही नाव असेल तर मुले ही बाई व गुरुजी स्वतःची हजेरी लावतात हे पाहून स्वतःची ही सही ,काहीजण नुसत्याच रेषा ओढतील  किंवा गिरगिटतील. या लेखन जाणिवेतून जातानाचा आनंद मात्र वेगळाच असतो.

पाककृती या कृतीत मुले आनंदाने सहभागी होतात. उदा. लिंबू सरबत, भेळ.या कृतीच्या निमित्ताने मुलांना वेगवेगळ्या क्रियापदांचा अप्रत्यक्षरीत्या परिचय देत असतो. जसे चिरणे ,कुटणे, किसणे, ढवळणे इ. या पदार्थासाठी लागणाऱ्या जिन्नसांची यादी, कृती सांगतानाचा योग्य क्रम, त्याची चव. या गोष्टी लिहूनही दाखवता येतील. या लिहिलेल्या गोष्टी तेही परत परत वाचतील हा लिहिण्याचा अनुभव आपल्यालाही खूपच आनंद देऊन जातो. जेव्हा मुले या कृतीचे चित्र रेखाटतात आणि जेव्हा ते त्याचा क्रम सांगतात तेव्हा त्यांचे लेखी मजकुराचे नवे जग खुले झालेले असते. लेखी मजकुराशी जवळीक वाढते . कुणीतरी कुठेतरी लिहून ठेवत, आपण आपल्याला हवे तेव्हा हव्या तितक्या वेळा ते वाचू शकतो व  रेखाटू शकतो आणि सांगू शकतो.

‘गाणे’ जे मुलांना शिकवायचे आहे ते मोठ्या अक्षरात लिहून ठेवूया. सुरुवातीला बोट ठेवत वाचून दाखवू या. त्यामुळे मुले स्वतःच वाचण्याचा प्रयत्न करू लागतील व तालासुरात योग्य उच्चारांसह म्हणण्याचा प्रयत्नही करतील.

वाढदिवसवर्गातील मुलाचा किंवा मुलीचा वाढदिवस असेल तर त्याला लेखी शुभेच्छा देणारा संदेश फळ्यावर लिहून तो मुलांना वाचून दाखवता येईल.

वाचन कोपरा यात मोठ्या आकाराची संपूर्ण वर्गाला दिसतील अशी चित्रे व मजकूरअसलेली पुस्तके असावीत. ती वाचून दाखवण्याआधी स्वतः दोन-तीन वेळा वाचावी. गोष्ट कायआहे ,पात्र कोणती , कशी बोलतात, कशी वागतात मग मुलांना ते कसे वाचून दाखवावे लागेल याचा विचार करूया. आता थोडे पुढे जाऊन अशी कल्पना करू या की, एके दिवशी गावात खूप माकडे आली. त्यांनी गावात खूप धुमाकूळ घातला. मुलांच्या मनाची खळबळ झाली. शाळेत आली ती माकडा संबंधिच बोलत आली. त्यांच्याच बोलण्यातील चार- पाच वाक्य फळ्यावर लिहून तीच त्यांना वाचायला सांगितली तर किती गंमत होईल! माकडासंबंधीचा मजकूर पुढील प्रमाणे असेल-

         आज गावात खूप खूप माकडं आली.

         एका माकडान तर दारात उडी मारली.

         खिडकीतून माकड घरात आल.

         माकडान मही टोपीच पळवली.

         टोपी घेऊन माकड काय करणार?

मग शिक्षकाने मुलांसाठी वाचायला मजकूर तयार केला व वाचून दाखवला.

      ‘माकडा माकडा हुप हुप, फळे खाऊ खूप खूप.’

मुले ती आनंदाने वाचत होती, म्हणत होती.

 “केवळ अनुकरण करून पानभर लिहिण्यापेक्षा मुलांच्या अनुभवांना सशब्द करणारे व त्याच्या ठिकाणची आत्म प्रगटीकरणाची ओढ पुरविणारे त्यांचे एक वाक्य त्यांच्या अंगचे वाचन-लेखन कौशल्य वाढवण्यास कितीतरी अधिक मोलाचे ठरते”. त्यामुळे त्यांचे लिखाण हे त्यांच्या अभिव्यक्तीचे माध्यम बनले पाहिजे. कारण आपण वर्गात जे बोलतो ते लिहिता येते, लिहिलेले परत परत वाचता येते. असे लक्षात येईल. मराठी सारखी भाषा डावीकडून उजवीकडे वाचतात व   लिहितात, नवीन ओळ लिहायला सुरुवात करताना कागदाच्या उजव्या टोकाकडून डाव्या टोकाकडे यावे लागते, वाक्यातील प्रत्येक शब्द सुटा लिहिला जातो. हेही कालांतराने लक्षात येईल. शाळेच्या परिसरात असलेली झाडे -झुडपे ,वेली ,फुले, डोंगरदऱ्या ,नद्या,नाले यांची माहिती विद्यार्थ्यांना आपण अशाच हसत-खेळत पद्धतीने करून द्यायला हवी. वर्गासमोरच मुलांच्या सोबत मातीत एखादे बीज पेरून त्या बीजाला अंकुर कसा फुटतो, अंकुराला पालवी कशी येते, पालवीचे इवलेसे रोप कसे होते आणि रोपांची हळूहळू वाढ कशी होते. यामधून साकार होणारी विकासावस्था त्यातून होणारा निर्मितीचा भाग त्यांच्यापुढे आपोआप विकसित होईल. यावरूनही आपण काही केले आहे किंवा करीत आहोत अथवा करू शकतो हा संस्कार रुजण्यास मदत होईल. कारण काही करावेसे वाटणे ही माणसाच्या मनोवृत्तीतील महत्त्वाची संकल्पना आहे. शिकण्याची खेळकर शैली व वैशिष्ट्यपूर्ण वातावरणात मुलांना शिकायला सहज आवडते. अशा एक ना अनेक संधी आपण मुलांना निर्माण करून इयत्तेची सर्व उद्दिष्टे मुले वैशिष्टपूर्ण सहभाग नोंदवून पूर्ण करतील.

श्री.देविदास गजानन गोसावी (विषय सहाय्यक मराठी बुलडाणा)

श्रीमती.शितल सच्चिदानंद बोधले

Published by

devidas1982

मी एक प्राथमिक शिक्षक आहे.व आज रोजी जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था (DIECPD) बुलडाणा येथे कार्यरत आहे.मला आरंभिक साक्षरतेवर काम करायला आवडते तसेच जे मुले अभ्यासात मागे राहतात त्यांच्यासोबत सुद्धा काम करतो.यासाठी शिक्षक ,पर्यवेक्षकीय यांत्रानेसोबत काम करत आहे . यासाठी मला QUEST व MSCERT पुणे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s