प्राथमिक शाळांमधील ‘वाचन’- कृष्णकुमार
सारांशात्मक मराठी रूपांतर – वर्षा सहस्रबुद्धे ( क्वेस्टकरिता )
प्रस्तावना
साक्षरतेचे प्रमाण भारतात अत्यल्प आहे. याची कारणे मुळापर्यंत जाऊन कृष्णकुमार तपासतात. ‘निरक्षरतेचे कारण गरिबी’ असे अनेक सामाजिक आणि शैक्षणिक संशोधनांमध्ये मांडलेले आढळते. मात्र, कृष्णकुमार म्हणतात, की गरिबी हे अनेक कारणांपैकी एक कारण असू शकेल. परंतु त्याहून जास्त गंभीर कारणे वाचन शिकवण्याचा पद्धतींशी जोडलेली आहेत. सुटी अक्षरे आणि सुटे शब्द, अर्थ न समजता केवळ ओळखण्याच्या कौशल्यावर सध्या शाळांमध्ये भर दिला जातो. शिकणार्या मुलांना अर्थ समजण्यामधून मिळणार्या समाधानापासून दूरच राहावे लागते. अर्थ समजून वाचण्यातला आनंद त्यांना अजिबात मिळत नाही.
मुले मुळातच चौकस असतात. आसपास काय चालू आहे याविषयी त्यांच्या मनात विस्मय असतो. अशा उत्सुक मुलांना वाचन–लेखन शिकवण्याच्या नावाखाली महिनोन् महिने अनुलेखन करायला लावले जाते. या पद्धतीने वाचायला शिकलेली मुले खर्या अर्थाने साक्षर होतात का, असा प्रश्न कृष्णकुमार उपस्थित करतात.
ते म्हणतात, की समाजात जबाबदारीने सहभागी होण्याची तयारी करून घेण्यासाठी ज्या प्रकारची साक्षरता लागते, ती साक्षरता मुलांना कमवायची असेल, तर अर्थ समजून वाचन करण्यासाठी मुलाला खूप प्रोत्साहन मिळायला हवे.
शिक्षणाचा प्रसार आणि साक्षरता हातात हात घालून पुढे गेलेले दिसत नाहीत. ज्या प्रमाणात शिक्षणाचा प्रसार झाला, त्या मानाने साक्षरतेचे प्रमाण लक्षणीय रीत्या वाढलेले नाही. कायम स्वरूपी साक्षर बनवण्यासाठी जेवढी वर्षे मुलांनी शाळेत टिकायला हवे, तेवढा काळ त्यांना शाळेत टिकवून ठेवण्यात आपल्या शाळा साफ अयशस्वी ठरतात. ‘गरिबी’कडे बोट दाखवत अनेक अभ्यासांमधून असे मांडले जाते, की गरीब पालक मुलांना शाळेतून काढतात आणि कामाला लावतात. या स्पष्टीकरणाचे कोणालाच नवल वाटत नाही. शिवाय भारतातली बालकामगारांची संख्या लक्षात घेता, त्याला पुष्टीच मिळते. नुकत्याच केलेल्या जवळजवळ पाचशेहून जास्त अभ्यासांमध्ये गळती आणि गरिबीचा असा थेट संबंध जोडलेला आढळतो.
मात्र, इयत्ता पहिली आणि दुसरी या दोन वर्षांमध्ये बालमजुरीचे मूल्य आश्चर्यकारक रीत्या एकदम वाढते की काय, असे वाटण्याएवढे या काळातले गळतीचे प्रमाण जास्त आहे. गळती झालेल्यांपैकी सुमारे ६१% विद्यार्थी अगदी लहान वयातच शाळा सोडतात. त्यांचे वय तेव्हा पाच ते सात वर्षांचे असते. आर्थिक कारणासाठी ही मुले शाळा सोडत असतील, तर याचा अर्थ असा निघतो, की पहिलीनंतरच्या वर्ष–दोन वर्षांत बालकामगार म्हणून त्यांचे मूल्य एकदम वाढत असावे ! नाही तर पहिलीत शाळेत नाव घातल्यानंतर त्या मुलाचे पालक दुसरीत त्याचे नाव शाळेतून का बरे काढून घेत असतील ?
यातून हेच ध्यानात येते की, गळतीच्या प्रश्नाकडे पाहताना आपण मुलांच्या दृष्टिकोनातून पाहायला हवे. तसे केले, तर एक प्रश्न आपण नक्कीच विचारू : “पहिलीतल्या मुलांना जे आवडते, जे हवे असेत ते आपल्या प्राथमिक शाळा देऊ करतात का ?” पहिलीच्या वयाच्या मुलांना असणार्या परमोच्च प्रेरणांपैकी एक म्हणजे अवतीभवतीच्या जगाबद्दल जाणून आणि समजून घेणे. अनारोग्य, कुपोषण, दिनक्रमावरचे निष्ठुर नियंत्रण अशा विपरीत घटकांमुळे ही प्रेरणा काहीशी मंदावत असली तरीही ती नाहीशी नक्कीच होत नाही. मुलाची परिस्थिती कशीही असेली तरी सहा वर्षांचे मूल भोवतालच्या जगाबाबत कमालीचे उत्सुक असते, त्याला ते कुशलतेने हाताळायचे असते, समजून घ्यायचे असते. हे सगळे करण्याच्या मूलभूत साधनांपैकी एक म्हणजे ‘भाषा’, आणि भाषेच्या विस्मयकारक सामर्थ्यांशी पहिलीच्या वयाला मूल उत्तम प्रकारे परिचित असते. नाती जोपासण्यासाठी, जपण्यासाठी, भोवतालच्या विशाल जगाचा शोध घेण्यासाठी मुलाने भाषेचा उपयोग केलेला असतो. हालचाल, स्पर्श, नजर, ऐकणे आणि वास यांच्या बरोबरीनेच सहा वर्षांच्या मुलाने भाषेच्या उत्तेजित करणार्या (exciting) सामर्थ्यांचा अनुभव घेतलेला असतो. समाजात वावरण्यातून त्याला हे माहीत झालेले असते की वाचन, लेखन आणि इतरही बरेच काही नवे, ताकद देणारे असे शिकण्याची जागा म्हणजे शाळा !
मोठे होणे आणि अधिकार, सत्ता, ज्ञान यांचा संबंध, शाळेत जाण्याआधी, पाच वर्षांच्या मुलाच्या मनात कसा जोडलेला असेल हे आपल्याला उमगणे अवघड आहे. ते कणभर जरी आपल्याला समजले, तरी सर्वसामान्य प्राथमिक शाळेत जाणारे मूल कसे निराश होऊन जात असेल, हे आपल्याला सहज समजेल. शाळेत गेल्यावर त्याला कळते की जगाविषयी अधिक समजून घेण्याची शाळा ही जागाच नव्हे ! एखाद्या प्रश्नाची उकल करण्यासाठी किंवा एखादी समस्या सोडवण्यासाठी मूल जी कौशल्ये वापरते, त्यांना पहिलीच्या वर्गात स्थानच नाही. ‘अर्थ लावणे’ आणि ‘समस्या सोडवणे’ यांचा शालेय अभ्यास विषयांमध्ये अंतर्भावच नाही !
अंतर्भाव आहे कशाचा ? तर, सुरुवातीलाच अक्षरांची नावे घोकण्याचा, त्यांचे आकार गिरवण्याचा ! पुन्हा पुन्हा संथा म्हटल्याप्रमाणे अक्षरांची नावे उच्चारणे आणि ती गिरवणे हेच मुलाने करणे अपेक्षित असते. अशा तर्हेने बाराखड्या यायला लागल्या की मग पाठ्यपुस्तकात दिलेली अक्षरे, त्यापासून बनणारे शब्द मुलाला वाचावे लागतात. या टप्प्यावर मुलाला ज्या शाळांना सामोरे जावे लागते, ते शब्द दीर्घ परंपरेने शिक्षणशास्त्रात रुळलेले शब्द असतात. मुलांची दृष्टी वा कुतूहल यांच्याशी त्या शब्दांचा दूरान्वयानेही संबंध नसतो.
शिवाय, मोकळेपणाने हात लावून पाहावे, हाताळावे, चाचपावे असे काहीही शाळेत नसते ! चौथ्या राष्ट्रीय शिक्षण आयोगाचे निष्कर्ष असे होते : ५०% शाळांना पक्की इमारत नाही, मैदान नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नाही; ४०% शाळांमध्ये फळे नाहीत, तर ७०% शाळांमध्ये वाचनालये नाहीत. सहा वर्षे वयाच्या लहानग्यांच्या दृष्टिकोनातून याकडे पाहिले तर शाळा म्हणजे रंग नसलेली, कोंदट आणि अलिप्त अशी एक जागा ! तिथे जायचे सोडून द्यावे असे वाटण्यासारखी ! मग त्याचे कारण काहीही असो.
आतापर्यंत केलेल्या विषयाच्या फेरमांडणीतून आपण काही गृहीतकांपर्यंत पोचतो. ती ही, की भाषा शिकवण्याच्या पद्धती, विशेष करून वाचन शिकवण्याच्या पद्धती, प्राथमिक शाळांमधील गळतीच्या प्रश्नासंदर्भात कळीच्या ठिकाणी आहेत. या प्रश्नाविषयीचे आतापर्यंत आपण न ऐकलेले असे स्पष्टीकरण, आपल्या शाळांमध्ये वापरल्या जाणार्या वाचन शिकवण्याच्या पद्धतींमध्ये दडलेले आहे. हे स्पष्टीकरण स्वीकारणे म्हणजे दारिद्र्याच्या आणि बालकामगारांच्या प्रश्नांचे गांभीर्य आणि यथार्थता आपण नाकारतो आहोत असे नव्हे. भुकेचा, निराश्रयाचा पटनोंदणीवर आणि उपस्थितीवर विपरीत परिणाम होतो हे निश्चितच. मुद्दा असा आहे की, या संदर्भात सर्व अंगांचा आणि कारणांचा काळजीपूर्वक विचार व्हायला हवा. शिक्षणाचे असे प्रतिरूप निर्माण व्हायला हवे, की ज्यात या सर्व कारणांची दखल घेतलेली असेल. प्राथमिक शाळांच्या शैक्षणिक स्थितीची दखल घेणार्या अभ्यासकांनी प्रश्नाचा विचार करताना, अध्यापन पद्धतीविषयक कारणांना परिघावरचे, थोडे कमी महत्त्वाचे स्थान दिले आहे. त्या कारणांकडे थोडे अधिक काळजीपूर्वक आणि गांभीर्याने पाहणे सयुक्तिक ठरेल. खास करून वाचन–लेखन शिकवण्याच्या पद्धतींबाबत जाकरूकतेने विचार व्हायला हवा. औपचारिक शिक्षणाची शालेय व्यवस्था ज्यांच्यावर उभारली जाते, अशी ही दोन पायाभूत अशी कौशल्ये आहेत.
साक्षर समाजाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘माहितीचे साठे.’ या साठ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी, त्यांचा फायदा घेण्यासाठी सक्षम व्हायचे, तर वाचनावर आणि लेखनावर उत्तम प्रभुत्व हवे. शाळेच्या बहुसंख्य ग्राहकांना, म्हणजे मुलांना ‘टिकाऊ साक्षरता’ देण्यात शालेय व्यवस्था अपयशी ठरत असेल तर त्याला गंभीर स्वरूपाची संख्यात्मक अकार्यक्षमता म्हणावे लागेल. अशा अकार्यक्षमतेला व्यापक असा सामाजिक संदर्भ असतो. आपल्या समाजात अशी परिस्थिती आहे असे म्हणायला पुरेशी कारणे आहेत. त्याचे एक लक्षण म्हणजे शाळेच्या सुरुवातीच्याच काळात होणारी गळती. पुढे वापरता येईल एवढा काळ टिकण्यासाठी साक्षरतेची पातळी गाठण्याआधीच बहुसंख्य मुले शाळा सोडतात. जी शाळेत टिकतात, त्यांपैकी अनेकांना वाचलेल्याचा अर्थ समजतोच असे नाही.
वाचनाच्या परिघाचा विचार केला तर वाचनाच्या प्रक्रियांविषयीचे शास्त्रीय ज्ञान जे सुचवते, त्याच्या अगदी विरुद्ध अशा पद्धती वाचन शिकवण्यासाठी आपल्याकडच्या शाळांमध्ये वापरल्या जातात. पहिलीत वाचन शिकवण्यासाठी वापरल्या जाणार्या सर्वसामान्य पद्धती वाचनाच्या आधुनिक संशोधनाच्या संदर्भात पाहिल्या, तर त्या वाचन शिकवण्याच्या पारंपारिक पद्धतींकडे झुकणार्या असल्याचे दिसते. थोडक्यात सांगायचे तर लिपी ही वेगवेगळ्या खुणांची गुंतागुंतीची व्यवस्था आहे आणि केवळ त्या खुणा आल्या की झाले, असा हा लिपीकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे. मुलांनी क्रमाक्रमाने अक्षरे शिकायची, मग शब्दांमधील एकेक अक्षर ओळखायचे…मुळाक्षरांशी पूर्ण परिचय झाला की मगच ती वाक्यांमध्ये वापरायला परवानगी ! या सगळ्याला खूपच वेळ लागतो. कारण यात यांत्रिक सरावाचे काम मोठ्या प्रमाणात करावे लागते. अशा यांत्रिक कामातून मुलाला समाधान मिळत नाही. त्या कामाचे फळही लगेच मिळत नाही. लिहिलेल्या किंवा छापलेल्या मजकुरात काय अर्थ दडला आहे, त्या अर्थाशी आपला संबंध कसा जोडलेला आहे, हे जाणून घेण्याची मुलाची उत्सुकता, या पद्धतीत खूप उशिरा शमते.
सर्वांत आधुनिक संशोधनातून असे लक्षात आले आहे की, वाचनाच्या गाभ्याशी दोन गोष्टी असतात. एक, त्याच्याशी आपले नाते शोधणे आणि दुसरी, अर्थ समजून घेणे. बोलणे, खेळणे, चित्र काढणे या सगळ्या आंतरक्रियांमध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारची चिन्हे वापरली जातात. सलग पुढे पाहात गेले, तर प्रतीके वापरण्याच्या याच धाग्यावर पुढचे टप्पे दिसतात, ते म्हणजे वाचनाची आणि लेखनाची कौशल्ये. मानवी मुलाची संवादात सहभागी होण्याची ओढ या धाग्यात गुंफलेली असते.
शब्द तोडून अक्षरे वाचणारी मुले आणि शब्द शब्द वाचत वाक्य तोडणारी मुले आपल्या प्राथमिक शाळांमध्ये प्रमाणात आहेत. एकंदर समाजातही असे तुटक वाचणार्यांची संख्या काही कमी नाही.
अशा पद्धतीने वाचायला शिकणारी काही मुलेही पुढे उत्तम वाचक बनण्याची शक्यता असते, पण त्यामागचे खरे कारण म्हणजे ‘शिक्षक’. एखादा उत्साही, प्रेमळ शिक्षण एखाद्या यांत्रिक कामातही अर्थपूर्णतेचे रंग भरू शकतो. याकरिता शिक्षकाकडे मुलांसाठी भरपूर वेळ असायला हवा. पूर्वी विद्यार्थी मोजके असताना अशी परिस्थिती होती. स्पर्धेचा अभाव, पुरेसा वेळ आणि कमी विद्यार्थी या घटकांमुळे पारंपरिक पद्धतींनीही मुले वाचन चांगल्यापैकी शिकत असत, असे दिसते. तेव्हा समाजातल्या एका विशिष्ट थरातली मुलेच साक्षर होत आणि मग त्यांना समाजाच्या भूतकाळाबाबतचे लिखित ज्ञान खुले होई. ज्यांना शिक्षण मिळते अशांपैकी आपण एक आहोत याची जाणीव असणेच इतके अर्थपूर्ण होते, की जे रोज शिकायचे त्याच्या अर्थपूर्णतेचा विचार शिक्षकांना पदोपदी करावा लागत नसावा, असे मानायला जागा आहे.
याहून सध्याची परिस्थिती फार निराळी आहे. पारंपरिक पद्धतीने वाचन–लेखन शिकवत राहणे म्हणजे पुराणपंथी वृत्तीने कालबाह्य गोष्टी कवटाळून ठेवण्यासारखे आहे. औद्योगिक प्रगती आणि त्यासाठी पूरक अशा सामाजिक–राजकीय संस्था या समाजातल्या बहुजनांनी साक्षर असण्याची मागणी करणार्या आहेत. व्यक्तिगत पातळीवरच्या प्रयत्नांमधून अर्थ शोधण्याची गरज त्यांनी निर्माण केली आहे. शिक्षणाच्या द्वारा व्यक्तिगत पातळीवरच्या अर्थपूर्णतेची भावना अनुभवता यावी यासाठी अमेरिकेपासून रशियापर्यंतच्या देशांनी बालककेंद्री पद्धतींचा शिक्षणात अंगीकार केला. बहुजनसमाजाला शिक्षणासाठी प्रेरित करण्याची आणि परिस्थितीचा अर्थ समजून घेण्यासाठी सक्षम करण्याची ताकद या पद्धतींमध्ये आहे.
औद्योगिकरणामुळे निर्माण झालेल्या गरजांमधून या पद्धतींचा जन्म झाला. औद्योगिक विकासासाठी त्या पूरक आहेत. या पद्धतींमधून साक्षरता सर्वदूर पोहोचते आणि तिचे स्वरूप टिकाऊ असते. माणसाची जगण्याची ओढ टिकण्याशी आणि औद्योगिक प्रगतीमुळे निर्माण होणार्या परिस्थितीचा अर्थ समजून घेण्याशीही या पद्धतींचा संबंध आहे.